डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती याठिकाणी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सोमवार दि. 15 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले असून त्याबाबतचे निवेदन बारामतीचे नायब तहसीलदार नामदेव काळे यांना देण्यात आले.
मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात राज्य सरकारने ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी व २ ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच ऑनलाईन कामासाठी देण्यात आलेली यंत्रणा (लॅपटॉप आणि प्रिंटर) कालबाह्य झाल्याने तेही बदलून देण्यात यावे या संदर्भात हे कामबंद आंदोलन सुरू असल्याचे यावेळी ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मयुरेश वाघमोडे यांनी सांगितले.
ऑनलाइन कामासाठी अनेक ग्राम महसूल अधिकारी यांना यापूर्वी लॅपटॉप देण्यात आले आहेत परंतु ते लॅपटॉप कालबाह्य झाल्याने तसेच अनेक ग्राम महसूल अधिकारी यांना प्रिंटर मिळाले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात अधिकाऱ्यांना विश्सावासत न घेता त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आली असून याचा निषेध करत जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुका आणि गावपातळीवरील कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनात सुमारे अडीच हजार कर्मचारी अधिकारी सहभागी झाले आहेत.
या काम बंद आंदोलनामध्ये सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Post a Comment
0 Comments