डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत लागू केलेल्या नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामती तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मोराळवाडी (ता.बारामती) येथील सामाजिक कार्यकर्ते व अंध माहिती अधिकार कार्यकर्ते नामदेव कारंडे यांनी केले आहे.
माहितीचा अधिकार कायदा हा सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता मिळवून देणारा आणि भ्रष्टाचाराला आळा घालणारा महत्त्वाचा कायदा मानला जातो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे यांनी अनेक वर्षे संघर्ष करून जनआंदोलन उभारले. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात माहिती अधिकाराची प्रभावी चळवळ उभी राहिली आणि पुढे देशभरात माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आला.
दरम्यान, राज्य शासनाने १२ जून २०२६ पासून लागू केलेल्या नवीन नियमांमध्ये अर्ज शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. तसेच अर्जासोबत छायाचित्रयुक्त ओळखपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले असून, एका अर्जासाठी १५० शब्दांची मर्यादा घालण्यात आली आहे. याशिवाय माहितीच्या प्रतींसाठी प्रति पान शुल्क वाढविण्यात आले आहे. या नियमांमुळे सामान्य नागरिकांना माहिती मिळविणे अधिक कठीण होईल, अशी भावना माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी हे नियम मागे घेण्याची मागणी करत राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिर परिसरात ५ जुलैपासून आमरण उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला राज्यभरातून माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
मोराळवाडी येथील अंध व्यक्ती नामदेव कारंडे यांनी बारामती तालुक्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि नागरिकांना या आंदोलनात सहभागी होऊन माहिती अधिकार कायद्याच्या संरक्षणासाठी एकजूट दाखविण्याचे आवाहन केले आहे. "माहितीचा अधिकार हा सामान्य नागरिकांचा हक्क असून तो अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे," असे त्यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments