बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायत भागात यंदा वटपौर्णिमा हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावर्षी या परिसरात चांगला पाऊस झाला नसल्याने महिलांचा उत्साह जरा कमीच दिसून आला.
लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, माळवाडी, मुढाळे, कानाडवाडी आदी परिसरात सोमवारी दि.२९ जून रोजी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
पतीला दीर्घायुरारोग्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून सुवासिनींनी वडाची मनोभावे पूजा केली. ग्रामीण भागात सणवार, व्रतवैकल्यांना फार महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. सावित्रीने आपल्या पतीला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. यामुळे यमराजाला तिचा पती परत द्यावा लागला. अशी ही सत्यवान सावित्रीची कथा आहे. या कथेच्या आधारेच आजही वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करतात.
सोमवारी बारामती तालुक्याच्या विविध गावांमध्ये महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली. सुवासिनी साजशृंगार करून हातामध्ये पूजेसाठी लागणारे साहित्य घेवून जाताना दिसत होत्या. वटवृक्षाजवळ केळी, आंबा, जांभुळ आदींसह विविध प्रकारची फळे ठेवून झाडाला हळदीकुंकू लावून पूजा करून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून त्याभोवती प्रदक्षिणा घालत जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करीत होत्या. सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण वाटत होत्या.
पळशी येथील हनुमान मंदिराजवळ असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाची पूजा महिलांनी केली. पळशी याठिकाणी हनुमान मंदिराशेजारी खूप मोठा वटवृक्ष असून हा वटवृक्ष सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीपेक्षा जास्त जुना असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत वडाच्या झाडांजवळ सुवासिनींची गर्दी असल्याचे चित्र दिसून येत होते.


Post a Comment
0 Comments