Type Here to Get Search Results !

स्व. अजितदादा पवार यांच्या नावाने जिल्हा परिषद स्तरावर कृषी किंवा शैक्षणिक योजना सुरू करावी; सुपे परगणा प्रमुख सुनील राजे भोसले यांची मागणी



डिजिटल महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषदेमार्फत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने कृषी किंवा शैक्षणिक विभागामध्ये नवीन योजना सुरू करून तिचे नामकरण त्यांच्या नावाने करण्यात यावे, अशी आग्रही मागणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपे परगणा प्रमुख सुनील राजे भोसले यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सुनील राजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे निधन झाले. कामाचा माणूस, तळागाळातील नेता आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात आणि जनसामान्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती आजही भरून निघालेली नाही.

येत्या २२ जुलै रोजी स्व. अजितदादा पवार यांची प्रथम जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव कायम स्मरणात राहावा, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत कृषी किंवा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित एखादी नवीन योजना सुरू करून त्या योजनेला स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अजितदादा पवार यांनी शेती, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासासाठी केलेले कार्य लक्षात घेता, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याबाबतची सकारात्मक दखल घेऊन संबंधित विभागांकडे शिफारस करण्यात यावी, अशी विनंतीही सुनील राजे भोसले यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments