डिजिटल महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे १ जुलै कृषी दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषीमित्र व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बारामतीतील युवा पत्रकार योगेश नालंदे यांना सन २०२४ चा 'वसंतराव नाईक शेतीमित्र' राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, भरतशेठ गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
योगेश नालंदे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उल्लेखनीय जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांनी अवघ्या एका वर्षात ३६५ प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा शोधून त्यांना व्यापक प्रसिद्धी दिली. या प्रेरणादायी यशोगाथांमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शेती, नावीन्यपूर्ण प्रयोग आणि सकारात्मक कृषीविषयक विचारांची प्रेरणा मिळाली.
याशिवाय कृषी वाहिनीवर कार्यरत असताना त्यांनी बाजारभाव, हवामानाचा अंदाज तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती नाट्यरूपांतरित ऑडिओच्या माध्यमातून तयार करून रेडिओवर प्रसारित केली. डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करून कृषी विभागाच्या विविध योजना आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांसाठी माहितीचे प्रभावी व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी 'शेतकरी योद्धा' या वृत्तपत्राचीही सुरुवात केली असून, त्याद्वारे शेतीविषयक माहिती, यशोगाथा आणि शासनाच्या योजनांचा प्रसार सातत्याने केला जात आहे.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत राहील, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित शेतकरी आणि मान्यवरांना दिली.
योगेश नालंदे यांना प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल पत्रकार, कृषी क्षेत्रातील मान्यवर आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments