Type Here to Get Search Results !

फोंडवाड्यात रास्ता रोको; धनराज पिसाळ आत्महत्याप्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील फोंडवाडा येथे कै. धनराज जयवंत पिसाळ यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. 17 ऑगस्ट 2026) फोंडवाडा येथे ग्रामस्थ, महिला आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. माळवाडी, फोंडवाडा, काऱ्हाटी आणि जळगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
कै. धनराज पिसाळ यांनी दि. 4 जुलै 2026 रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी सतीश हरिश्चंद्र पिसाळ यांच्यासह अन्य चार जणांविरुद्ध प्रॉपर्टीच्या कारणावरून त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, आरोपी गावात तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत असतानाही पोलिसांना ते सापडत नाहीत, हे अत्यंत गंभीर आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुरावे म्हणून चिठ्ठी आणि व्हिडिओ असल्याचा दावा करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कै. धनराज पिसाळ यांच्या कुटुंबाला सातत्याने त्रास दिल्याने त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. एका मातेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करत संतप्त महिला आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.
या आंदोलनाला बारामती शिवसेनेने पाठिंबा दिला. आरोपींना पाच दिवसांत अटक न झाल्यास शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी मोरगाव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्याकडे आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
या आंदोलनावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हनुमंत भापकर, जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब शिंदे, संपर्कप्रमुख अधिराज कोठाडीया, बंटी गायकवाड, संभाजी शिंदे, सुदाम शिंदे, उमेश जाधव, दत्ता लोणकर, निखील देवकाते, शौकत बागवान, डॉ. अतुल पिसाळ, अनिल लडकत, अनिल जगताप यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments