डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
आंबळे (ता. पुरंदर) : किशोरवयीन मुलींच्या आरोग्य-जागृतीसाठी आणि स्वच्छतेच्या दृष्टीने पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे येथील सार्थक आश्रमामध्ये राहणाऱ्या पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताप वस्ती येथील शिक्षिका श्रीमती छाया जगदाळे यांनी आश्रमातील सर्व मुलींसाठी 500 सॅनिटरी नॅपकिन तसेच नॅपकिन डिस्पोज मशीनचे विनामूल्य वितरण केले.
स्वतःच्या पारितोषिकाची रक्कम समाजकार्यासाठी
श्रीमती जगदाळे म्हणाल्या,
"मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. माझ्या पारितोषिकाच्या रकमेतूनही मी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणार आहे.
त्यांच्या या उपक्रमामुळे मुलींमध्ये शारीरिक स्वच्छता, आरोग्य जागृती व आत्मविश्वास वाढविण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
अधिकाऱ्यांनी व्यक्त केले गौरवोद्गार
कार्यक्रमात उपस्थित पुरंदर तालुक्याच्या गटविकास अधिकारी सौ. प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी छाया जगदाळे यांच्या या सामाजिक जाणीवेचे कौतुक करताना हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण असल्याचे सांगितले.
गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल म्हणाले,
"किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून या माध्यमातून समाजात संवेदनशीलता वाढेल."
राजेवाडी केंद्राचे विस्तार अधिकारी गोविंद लाखे यांनीही या प्रयोगाचे कौतुक केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
या प्रसंगी पुरंदर पंचायत समितीचे विषय तज्ञ भरत जगदाळे, विषय शिक्षक दिपक पाटील, मुख्याध्यापक नंदकुमार कुंजीर, जगताप वस्ती शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मेमाणे, रामवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष बोरकर, शिक्षक रामदास भगत, तसेच सार्थक आश्रमातील रूपाली कोकाटे, मॅनेजर प्रियंका राठोड, सुपरवायझर अक्षय जाधव व स्नेहल जगदाळे उपस्थित होते.
सामाजिक जाणीवेचा आदर्श
छाया जगदाळे यांच्या या उपक्रमातून शिक्षकाचे काम फक्त शिक्षणापुरते न थांबता समाजघटनाही करता येते हे अधोरेखित झाले आहे.
स्थानिक ग्रामस्थ व शिक्षण क्षेत्रात या उपक्रमाचे मनापासून स्वागत होत आहे.


Post a Comment
0 Comments