डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर याठिकाणी ग्रामविकास अधिकारी उज्वला शिंगाडे यांच्या विरोधात सुरू असलेले धरणे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. बुधवार दि.२६ नोव्हेंबरपासून मनोज साठे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणस्थळी विस्तार अधिकारी भीमराव भागवत यांनी भेट दिली आणि उपोषणकर्ते मनोज साठे यांच्याशी चर्चा केली, या संदर्भातील चौकशी करण्याचे लेखी आश्वासनही यावेळी त्यांना देण्यात आले. किती दिवसात हा चौकशी अहवाल पूर्ण होईल याबाबत साठे यांनी विचारले असता विस्तार अधिकारी यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे यापुढेही आंदोलन सुरूच राहील असे साठे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई करावी अथवा त्यांची लोणी भापकर येथून बदली करावी यावर ते ठाम राहिले आहेत.
जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही किंवा ग्रामसेविकाच्या विरोधात निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील असेही साठे यांनी यावेळी सांगितले.
हे आंदोलन मिटावे यासाठी अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी तसेच विस्ताराधिकारी यांनी प्रयत्न केले परंतु यावरती दिवसभरात तोडगा निघाला नाही. ग्रामविकास अधिकारी उज्वला शिंगाडे यांच्यावर कारवाई व्हावी या मुद्द्यावर आंदोलनकर्ते ठाम असल्याचे दिसून आले.
यावेळी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील जांगडे, सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा रवी साळवे, अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा चिटणीस निखिल आढळगे, प्रहारचे रोहित भालेकर, सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे, रवींद्र भापकर, संदीप पवार, श्रीकांत भापकर, उदयसिंह भापकर, नंदकुमार मदने, विजय बारवकर, नवनाथ भापकर, पोलीस हवालदार तौसिफ मणेरी, लोणी भापकरचे पोलीस पाटील संजय गोलांडे, मासाळवाडीचे पोलीस पाटील सुभाष ठोंबरे, दादा कडाळे तसेच गावातील ग्रामस्थ आंदोलनस्थळी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments