डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पळशी येथे लोणी भापकर रोडवरील उतारावर ओव्हरलोड उसाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसली, तरी काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली लोणी भापकर-पळशी रोडवरील उतारावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त उस भरल्याने ट्रॉलीचे संतुलन बिघडले आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या अपघातामुळे रस्त्यावर उस मोठ्या प्रमाणात विखुरला गेला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी आणि वाहनचालकांनी मदत करत रस्त्यावर पडलेला उस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चालक सुखरूप बचावला असून मोठा अनर्थ टळला आहे.
गेल्या काही दिवसांत उस वाहतुकीदरम्यान अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त उस भरल्याने वाहनाचे संतुलन बिघडते, तसेच उतारावर वाहनाचा वेग नियंत्रित न राहिल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय ट्रॅक्टर ट्रॉलीतील तांत्रिक त्रुटी, यांत्रिक बिघाड, वळणदार रस्ते आणि अपुरी प्रकाश व्यवस्था ही देखील अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अशा घटनांमुळे केवळ वाहतूक कोंडी निर्माण होत नाही, तर रस्त्यावर विखुरलेल्या उसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. अनेक वेळा अपघाताची तीव्रता मोठी असते आणि जीवितहानी होण्याची भीती कायम असते.
दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त उस भरू नये आणि उतारावर वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा, असे आवाहन पोलिस प्रशासन तसेच शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments