डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुर्टी याठिकाणी श्रीमत परमहंस सद्गुरु दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज ११० वी पुण्यतिथी निमित्त सोमवार दि. ९ मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे.
सोमवार दि. ९ मार्च पासून मंगळवार दि. १७ मार्चपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. यामध्ये विविध प्रवचनकार व कीर्तनकार यांची कीर्तने होणार आहेत.
सोमवार दि. ९ मार्च रोजी ११.३० वाजल्यानंतर विना पूजन करून श्री ज्ञानेश्वरी वाचनाने सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
या सप्ताहामध्ये पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत अखंड विना, सहा ते सात वाजता काकड आरती व भजन, सात ते अकरा विष्णू सहस्त्रनाम, अकरा ते बारा ज्ञानेश्वर पारायण, १२ ते ४ गाथा भजन, सायंकाळी पाच ते सहा प्रवचन, सहा ते सात हरिपाठ, सात ते नऊ भोजन आणि संध्याकाळी ९ ते ११ कीर्तन आणि ११ नंतर हरिजागर होणार आहे.
यामध्ये ह.भ.प चैतन्य महाराज शिंदे, कंठभूषण ह भ प हनुमंत महाराज मारकड, अमेय महाराज शिंदे, दादा महाराज साठे यांची कीर्तने पार पडली आहेत तर अभिमन्यू महाराज कदम, शामसुंदर महाराज ढवळे, सुभाष महाराज जाधव, गणेश महाराज बालगुडे व काल्याचे किर्तन संजय महाराज वेळुकर (सातारा) यांचे कीर्तन होणार आहेत.
सप्ताहाचे यंदाचे हे ३८ वे वर्ष आहे. मुर्टीतील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम संपन्न होत असतो. यामध्ये सप्ताह कमिटी, यात्रा कमिटी व ग्रामस्थ सहभाग घेत असतात.



Post a Comment
0 Comments