Type Here to Get Search Results !

बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, उपसभापतीपदी शुभांगी आगवणे



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी सांगवी येथील किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी पंचायत समिती गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीकडे बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.

बारामती तालुका हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात होती. अखेर सांगवी येथील किरण तावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.



किरण तावरे हे पणदरे गटातून पंचायत समितीसाठी निवडून आले आहेत. स्थानिक पातळीवर संघटन कौशल्य, राजकीय अनुभव आणि कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्या समोर असणार आहे.

किरण तावरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे या पूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे तावरे कुटुंबाला स्थानिक राजकारणाचा मोठा अनुभव असल्याचे मानले जाते.

दरम्यान, या निवडीमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या निवडीमुळे बारामती तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.



सभापतीपदी निवड झाल्यानंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शेतकरी, महिला आणि युवकांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments