Type Here to Get Search Results !

बारामतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सभापती किरण तावरे यांचे सकारात्मक आश्वासन

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बारामती पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती किरण तावरे यांची भेट घेतली. यावेळी सर्व संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांची एकत्रित संयुक्त बैठक घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
बारामती तालुक्यात सुमारे ९९ पेक्षा अधिक ग्रामपंचायती कार्यरत असून त्यामध्ये ६०० हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे गावपातळीवर काम करणारा हा वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने हे शिष्टमंडळ सभापतींना भेटले. संघटनेचे संस्थापक कॉम्रेड ज्ञानोबा घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष राहुल तावरे व सचिव भोलेनाथ खोमणे यांच्या उपस्थितीत ही भेट पार पडली.
या वेळी कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन पगार प्रणाली, किमान वेतनातील तफावत, राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी, सेवा पुस्तिका अद्ययावत करणे, तसेच काही ठिकाणी होत असलेल्या प्रशासकीय पिळवणुकीसंदर्भात लेखी निवेदन सभापतींना दिले. तसेच, या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती करण्यात आली.
या प्रसंगी कुंडलिक कुचेकर, संजय दुबळे, अभिजीत गवळी, सोमनाथ कुंभारकर, मारुती खोमणे, कमल जगताप, नंदा जराड, पल्लवी बागाव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी संबंधितांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सभापती किरण तावरे यांनी यावेळी दिले.




Post a Comment

0 Comments