डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
तरडोली (ता. बारामती) येथील अबोली हनुमंत भापकर हिने "द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया" यांच्या वतीने सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए च्या फायनल परीक्षेत यश मिळविले आहे.
अबोलीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरडोली तर दहावीपर्यंत माध्यमिक शिक्षण मोरगाव येथे श्री मयुरेश्वर विद्यालय येथे झाले आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण पुणे येथे हुजूरपागा मध्ये घेतले. अकरावी आणि बारावी मध्ये ती कॉलेजला प्रथम क्रमांकाचे यश मिळवून उत्तीर्ण झाली. गरवारे महाविद्यालयात तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. इयत्ता बारावीनंतर तिने सीए परीक्षेची तयारी सुरू केली. सी. ए. होण्याचे अबोलीचे स्वप्न होते. सीए करत असतानाच तिने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. सीएसीपीटी देऊन इंटरमिजिएट परीक्षेची तयारी सुरू केली. इंटरमिजिएट परीक्षेत जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यासात सातत्य राखून दोन्ही ग्रुप मध्ये यश मिळवले. त्यानंतर फायनल एक ग्रुप सप्टेंबर २०२५ मध्ये उत्तीर्ण झाली तर दुसराही ग्रुप जानेवारी २०२६ मध्ये परीक्षा देऊन सी ए परीक्षेत उत्तीर्ण होत यश मिळवले.
शेतकरी कुटुंबातील अबोलीचे वडील हनुमंत भापकर गेली 35 वर्ष सामाजिक क्षेत्रात तर आई एकवीस वर्ष दैनिक सकाळ मध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. लेकीने कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने अत्यंत आनंद, समाधान आणि अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया भापकर परिवाराने दिली.
"सीए च्या परीक्षेतील यशात आई, वडील, भाऊ संपूर्ण भापकर परिवार आणि गुरुजन वर्ग या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्र मैत्रिणींनी मोठी साथ दिली. जिद्द, चिकाटी, परिश्रम व अभ्यासाचे सातत्य यामुळे सीएच्या परीक्षेत अतुलनीय यश मिळाले असल्याचे अबोली भापकर हिने सांगितले."
अबोली भापकर यांच्या यशाचे तरडोली ग्रामस्थांसह मोरगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे. एकावेळी सीए, लॉ करत अबोलीने मोठ्या जिद्द व चिकाटीने वेळेचे काटेकोरपणे नियोजन करत हे यश संपादन केले. अबोलीने मिळवलेल्या यशाबद्दल पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अजितदादांच्या आठवणीने पाणवले डोळे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार मुलींना शिक्षणात नेहमी प्रोत्साहन देत, कौतुक करत असल्याचे समाजाला अभिप्रेत आहे. अबोलीने सी ए ची तयारी सुरू केल्यानंतर २०१९ मध्ये एका कार्यक्रमात अजित पवार यांनी तिला कुटुंबात मार्गदर्शन कोण करते. अभ्यास किती तास करते, वेळेचे नियोजन, भविष्यात काय करणार आहेस याची बारकाईने व आस्थेने माहिती घेतली होती...आणि कुठेही मदत लागली तर थेट फोन कर असेही सांगितले होते. सीए झाल्याचे हे यश पाहण्यासाठी आज दादा हवे होते त्यांना मी कधीच विसरू शकत नाही.अशी प्रतिक्रिया व्यक्त करत अबोलीचे डोळे दादांच्या आठवणीने पाणवले.



Post a Comment
0 Comments