डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती पंचायत समितीच्या गटनेतेपदी मोरगाव पंचायत समिती गणातून चांगल्या मताधिक्याने विजयी झालेले बाबा चोरमले यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे.
पळशी गावचे माजी आदर्श सरपंच म्हणून कार्य करताना बाबा चोरमले यांनी ग्रामविकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ठसा उमटवला आहे. पाणीपुरवठा योजना सक्षम करणे, अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावणे, शेत मोजणी तसेच शेतकरीहिताच्या उपक्रमांना चालना देणे अशा अनेक कामांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांशी त्यांचा थेट, साधा आणि विश्वासार्ह संवाद कायम राहिला आहे.
गटनेता म्हणून पंचायत समितीतील सदस्यांमध्ये समन्वय साधणे, शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि विकासकामांना गती देणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. विशेषतः शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, पाणी व्यवस्थापन सुदृढ करणे, ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करणे, महिला बचतगटांचे सक्षमीकरण आणि युवकांसाठी कौशल्य आधारित रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर ते भर देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना बाबा चोरमले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत ही जबाबदारी सन्मानाची आणि विश्वासाची असल्याचे सांगितले. सर्व सदस्यांना सोबत घेऊन स्वर्गीय अजित पवार यांच्या विचारांची प्रेरणा जपत बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक आणि पारदर्शक प्रयत्न करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बारामती पंचायत समितीतील या नव्या नेतृत्वाकडून आता विकासकामांना नवी दिशा आणि वेग मिळेल, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.


Post a Comment
0 Comments