Type Here to Get Search Results !

जोगवडीतील मुर्टी-जोगवडी रस्त्याची रोहिणीताई ढोले-कदम यांची पाहणी

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील जोगवडी परिसरातील मुर्टी-जोगवडी रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून, या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणीताई ढोले-कदम यांनी नुकतीच या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची तोंडी मागणी केली होती. त्या अनुषंगाने रोहिणीताईंनी तातडीने पाहणी करत संबंधित कामासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून लवकरात लवकर दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी जोगवडी परिसरातील वाड्या-वस्त्यांनाही भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीमालाला मिळणारा बाजारभाव, दुधाचे दर तसेच सध्या सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

विशेषतः लोडशेडिंगच्या समस्येबाबत लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ही सर्व विकासकामे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मोरगाव गटामध्ये राबविण्यात येणार असल्याचेही रोहिणीताईंनी सांगितले.

यामुळे जोगवडी परिसरातील नागरिकांमध्ये विकासकामांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, रस्त्याच्या दुरुस्तीला लवकर सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments