Type Here to Get Search Results !

लोणीभापकर ला गुरुवारी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” नागरिकांच्या विविध प्रशासकीय प्रश्नांचे एकाच ठिकाणी होणार निराकरण



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराद्वारे नागरिकांच्या महसूल व विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे. हे शिबिर गुरूवार दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल, लोणीभापकर येथे पार पडणार आहे.

महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांचे दैनंदिन प्रशासकीय प्रश्न सोडविणे, तसेच शासन सेवा अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभरात मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात महसूल विभागासह ग्रामीण विकास विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग, आधार संबंधित सेवा, पोस्ट ऑफिस सेवा तसेच विविध दाखले व कागदपत्रांशी संबंधित कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

शिबिरात नागरिकांना उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, फेरफार, ७/१२ उतारे, आधार संबंधित अडचणी, विविध शासकीय योजनांची माहिती आणि इतर आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

  या कार्यक्रमासाठी पंचायत समिती बारामतीचे सभापती किरण तावरे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई कदम (ढोले), पंचायत समिती सदस्या वैशाली कोकणे, गटनेते बाबासाहेब चोरमले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्निल रावडे आणि गटविकास अधिकारी किशोर माने, मंडलाधिकारी एस आर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

लोणीभापकर मंडळ अधिकारी व मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments