Type Here to Get Search Results !

रिक्षाचालकाच्या मुलीची जिद्दीला यशाची सलामी ; पळशीची प्रीती पोटे ठाणे ग्रामीण पोलीस दलात

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

पळशी (ता. बारामती) येथील प्रीती अनिल पोटे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर ठाणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या यशामुळे पळशी गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सध्या प्रीतीचे कुटुंब कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. तिचे वडील रिक्षाचालक म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून आई गृहिणी आहे. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असतानाही प्रीतीने शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवत यश संपादन केले.

प्रीतीचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण नवी मुंबई महापालिका प्राथमिक शाळा, नेरूळ येथे झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीचे शिक्षण नवी मुंबई महापालिका माध्यमिक शाळा, नेरूळ येथे पूर्ण केले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी येथे झाले. पोलीस भरतीसाठीचे विशेष प्रशिक्षण तिने श्री करिअर अकॅडमी, नेरूळ येथे घेतले.

या यशामागे शाळेतील शिक्षक, अकॅडमीतील प्रशिक्षक तसेच मित्र-मैत्रिणींचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रीतीने सांगितले. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि आत्मविश्वास यांच्या जोरावरच हे यश मिळाल्याची भावना तिने व्यक्त केली.



पोलीस दलात भरती झाल्यानंतरही प्रीतीची स्वप्ने इथेच थांबलेली नसून भविष्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) बनण्याचे ध्येय असल्याचे तिने सांगितले. तिच्या या ध्येयवेड्या प्रवासामुळे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना प्रेरणा मिळत आहे.



प्रीतीच्या या यशाबद्दल पळशी गावचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments