Type Here to Get Search Results !

लोणी भापकर हद्दीतील वनक्षेत्रात वन्य प्राण्यांना दिलासा; अमोल मदने मित्र परिवाराच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

लोणी भापकर (ता. बारामती) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भैरवनाथ एकता ग्रुपचे अध्यक्ष अमोल मदने यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाचा खर्च टाळून वनक्षेत्रातील पाणवठ्यात टँकरने पाणी सोडण्यात आले. या उपक्रमामुळे उन्हाच्या तीव्र झळांमुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यजीवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या वाढत्या तापमानामुळे व कडक उन्हामुळे वनक्षेत्रातील अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले आहेत. परिणामी वन्य प्राण्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन अमोल मदने व त्यांच्या मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला.



या उपक्रमांतर्गत वनक्षेत्रातील पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात आले. या कार्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होणार असून पर्यावरण संवर्धनाचा एक सकारात्मक संदेशही समाजात पोहोचला आहे. अमोल मदने व त्यांच्या मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार मदने, दलित पँथर अध्यक्ष अविनाश बनसोडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज मदने, वनरक्षक गोरख भापकर, दत्तात्रय भापकर, किरण खोमणे, मंगेश गोलांडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments