डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव–मुर्टी–निरा रोडवर भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. निरा–मोरगाव रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहनांचा वेग वाढला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या सायकल स्पर्धेदरम्यान रस्त्यावर असलेले गतिरोधक काढण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावर वारंवार अपघात होऊ लागल्याने नागरिकांकडून पुन्हा गतिरोधक बसविण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
दरम्यान, पाच ते सहा दिवसांपूर्वी मुर्टी येथे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुर्टी गावठाण परिसरात पाच ते सहा ठिकाणी नवीन गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
या अपघाताच्या आधीही ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती. अखेर नागरिकांच्या मागणीचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही केल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभारही नागरिकांनी मानले आहेत.
मात्र, नव्याने बसविण्यात आलेल्या गतिरोधकांवर अद्याप पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा भरधाव वाहनांना गतिरोधक स्पष्ट दिसत नसल्यास पुन्हा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या सर्व गतिरोधकांवर तातडीने चांगल्या दर्जाचे पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आवाहन करताना, “अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविणे महत्त्वाचे आहेच, पण ते वाहनचालकांना स्पष्ट दिसणेही तितकेच आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.



Post a Comment
0 Comments