डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)
बारामती तालुक्यातील मोरगाव-नीरा हा राज्य महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे धोकादायक बनला असून या मार्गावर दरमहा सरासरी ८ ते १० अपघात होत असल्याची गंभीर परिस्थिती आहे. अनेकदा या अपघातांमध्ये मृत्यू दुर्घटनाही घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मोरगाव येथे कायमस्वरूपी १०८ क्रमांकाची आपत्कालीन रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती.
मोरगाव येथे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कायमस्वरूपी उपलब्ध नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल ३५ ते ४५ मिनिटांचा विलंब होत होता. त्यामुळे गंभीर रुग्ण व अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या. याच पार्श्वभूमीवर मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका स्टेशन मंजूर करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई संदीप कदम (ढोले) यांच्याकडून करण्यात आली होती.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार तसेच युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई संदीप कदम (ढोले) यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी १८ मे रोजी संबंधित विभागाकडे अधिकृत मागणीपत्र सादर केले होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत म्हणजेच २६ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मोरगाव येथे कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका स्टेशनला मंजुरी दिली.
या मंजुरीमुळे आता मोरगाव तसेच परिसरातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक जलद गतीने उपलब्ध होणार असून अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे. लवकरच मोरगाव येथे १०८ रुग्णवाहिकेचे कायमस्वरूपी स्टेशन कार्यान्वित होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मोरगाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून सर्व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई संदीप कदम (ढोले) यांच्या सामाजिक बांधिलकी, तत्परता आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.


Post a Comment
0 Comments