डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्पाच्या संदर्भात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दि. ३१ मे रोजी उत्साहात पार पडली. बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये या योजनेबाबत निर्माण झालेल्या विविध शंका व संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेलाही उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, खासदार पार्थदादा पवार आणि जयदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई संदीप कदम (ढोले) यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर आपली मते व प्रश्न मांडले.
बैठकीत पश्चिम जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या मनात या योजनेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला. प्रकल्पामुळे होणारे फायदे, सिंचन व्यवस्थेतील सुधारणा तसेच भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांना उपस्थित मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे देत योजनेबाबत सकारात्मक माहिती दिली.
दिवंगत नेते अजितदादा पवार यांची जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठीची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. याबाबत त्यांनी निवडणुकीदरम्यान जिरायत हा शब्द पुसण्याचा उल्लेख देखील केला होता.
यावेळी पुरंदर उपसा सिंचन योजनेतील कामांमध्ये अद्यापही काही त्रुटी असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, शेतकऱ्यांच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढणे आणि सिंचन व्यवस्थेला अधिक सक्षम बनविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
तसेच पाणी वापर संस्था स्थापन करणे, पुरंदर उपसा सिंचन योजनेतील अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करणे, शेतकरी व अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करणे, सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवरही चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या सर्व चर्चेनंतर रोहिणीताई कदम यांनी पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी व संबंधित अधिकारी यांची सिंचन भवन पुणे या ठिकाणी लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस बारामती पंचायत समितीचे गटनेते बाबासाहेब चोरमले, मोरगाव सह पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय आजी-माजी पदाधिकारी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्प आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीमुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होण्यास मदत झाली असून भविष्यातील सिंचन विकासासाठी सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




Post a Comment
0 Comments