डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी–माळवाडी हद्दीत मंगळवारी (दि. २ जून) सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत भिंत व शेड कोसळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तसेच ११ बकरी, बोकड व शेळ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी–माळवाडी परिसरात अचानक वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने थैमान घातले. यावेळी बंद असलेल्या साक्षी ढाब्याजवळ आडोशाला थांबलेल्या नंदाबाई जनार्दन लडकत (वय ६५) यांच्या अंगावर भिंत व पत्र्याचे शेड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मंदा प्रताप फरांदे, प्रल्हाद पांडुरंग लडकत व बाळासाहेब अमृता लडकत हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याच वादळी वाऱ्यामुळे परिसरातील जनावरांचेही मोठे नुकसान झाले असून तब्बल ११ शेळ्या व मेंढ्या दगावल्या व चार-पाच शेळ्या जखमी झाल्या आहेत अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मृत्यू झालेल्या नंदा जनार्दन लडकत या माळवाडीच्या माजी सरपंच मंजुषा लडकत यांच्या सासूबाई होत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून लडकत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच लोणी भापकरचे मंडल अधिकारी संतोष नलावडे, माळवाडी-लोणीचे तलाठी विकास बारवकर, जळगावचे तलाठी संदीप भांडवलकर तसेच लोणी भापकरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पंचनामा केला. यावेळी पळशीचे ग्रामसेवक विठ्ठल घाडगे, तसेच माळवाडीचे काही ग्रामस्थ उपस्थित होते.
घटनेची माहिती मिळताच एपीआय मनोजकुमार नवसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष पवार, अमोल चिरमे, संतोष जावीर, सचिन दरेकर यांनी घटनास्थळी दहा मिनिटाच्या आत धाव घेत जखमींना मदत केली. पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.
या झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत व वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता लोणकर यांनी केली आहे.



Post a Comment
0 Comments