Type Here to Get Search Results !

गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख असलेले नामफलक लावावेत : सुनील राजे भोसले यांची मागणी

 



डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
जगाच्या इतिहासात अद्वितीय स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या बलिदानाची माहिती भावी पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, तसेच त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन व्हाव्यात यासाठी राज्यातील गड-किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख असलेले नामफलक उभारण्यात यावेत, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
जोगवडी येथील शिवाजी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पुरंदर उत्सव समितीचे अध्यक्ष तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपे परगणा प्रमुख सुनील राजे भोसले यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
सुनील राजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले कार्य, त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, युद्धनीती, प्रशासन व्यवस्था आणि त्यांच्या मावळ्यांचे अतुलनीय शौर्य हे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. यासाठी राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ले, स्मारके आणि पर्यटनस्थळांवर माहितीपर नामफलक उभारल्यास पर्यटक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींना स्वराज्याच्या इतिहासाची सविस्तर माहिती मिळण्यास मदत होईल.
तसेच अनेक पर्यटक गड-किल्ल्यांना भेट देत असतात. मात्र, अनेक ठिकाणी इतिहासाची सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पराक्रमाबाबतची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाही. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळी महाराजांच्या कार्याचा, मावळ्यांच्या शौर्याचा आणि त्या ठिकाणाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख असलेले आकर्षक व माहितीपूर्ण नामफलक उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाचा अभिमान आहे. हा इतिहास अजरामर राहावा, त्यांच्या स्मृती मनामनांत कायम तेवत राहाव्यात आणि स्वराज्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांना ज्ञात व्हावा, या उदात्त हेतूने ही मागणी करण्यात आल्याचे सुनील राजे भोसले यांनी सांगितले.
या मागणीला इतिहासप्रेमी, शिवभक्त आणि विविध सामाजिक संघटनांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, संबंधित प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments