डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत वाकी येथे १ जुलै रोजी स्वागत कार्यक्रम तसेच कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मारुती मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्यात संवाद साधत ग्रामीण विकास व कृषी क्षेत्रातील उपक्रमांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून देत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. आगामी कालावधीत गावात राहून कृषीविषयक विविध उपक्रम, जनजागृती, शेतकरी संवाद आणि ग्रामविकासाशी संबंधित कार्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कृषी दिनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेला गावाचा नकाशा होय. या नकाशाच्या माध्यमातून गावातील विविध ठिकाणे, रस्ते तसेच महत्त्वाच्या भागांचे सादरीकरण करण्यात आले. ग्रामस्थांनी उत्सुकतेने नकाशा पाहत विद्यार्थ्यांकडून त्याबाबत माहिती जाणून घेतली. अनेक ग्रामस्थांनी हा उपक्रम नाविन्यपूर्ण असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील कृषी पद्धती, स्थानिक अडचणी आणि गावाच्या विकासासाठी आवश्यक बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्वागत समारंभ, भाषणे, परिचय आणि संवादातून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात पार्थ कदम, स्वराज कांबळे, सागर दीक्षित, अथर्व भोंगळे, सैराज साखळा, जयेश जाधव व अवधूत दादास यांनी सहभाग घेतला. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी : वाकी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत स्वागत समारंभ व कृषी दिन साजरा करताना मान्यवर व कृषीचे विद्यार्थी.


Post a Comment
0 Comments