डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्याचे माजी शिवसेना तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भगवा झेंडा स्वीकारून शिवबंधन बांधत त्यांनी शिवसेनेत पुनरागमन केले. या प्रवेशावेळी खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, जिल्हाप्रमुख संजय काळे, बारामती विधानसभा संपर्कप्रमुख आदिनाथ कोठाडिया तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
हनुमंत भापकर यांनी यापूर्वी बारामती तालुकाप्रमुख म्हणून सलग आठ वर्षे काम केले असून शिवसेनेत विविध जबाबदाऱ्यांवर तब्बल १७ वर्षे कार्य केले आहे. स्वगृही परतल्याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा जनतेसाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भापकर यांनी सांगितले की, ५ जून २०११ रोजी जिरायत भागातील शेतीसाठी पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, नाझरे धरणाची उंची, खोली आणि रुंदी वाढविण्यात यावी तसेच जिरायत भागाला सिंचनासाठी पाणी मिळावे या अपेक्षेने तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या काही डागडुजीच्या कामांव्यतिरिक्त जिरायत भागासाठी अपेक्षित विकासकामे झाली नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कऱ्हा-नीरा नदी जोड प्रकल्पाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने मंजूर केलेल्या योजनेत बारामतीच्या जिरायत भागातील सर्व शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सद्यस्थितीत बंद पाइपलाइनद्वारे मर्यादित गावांनाच लाभ मिळणार असल्याने जिरायत भागाचा मूलभूत प्रश्न अद्याप कायम असल्याचे त्यांनी सांगितले. २२ गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी परिषद अध्यक्ष म्हणून बारमाही सिंचनाची मागणी आपण सातत्याने करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भापकर यांनी पुढे सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात समन्वय राहिला नाही. त्यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली नाही, तसेच पोलीस प्रशासनाने संबंधित तक्रारही नोंदवून घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
"माझा राजकीय जन्म शिवसेनेत झाला. त्यामुळे पुन्हा शिवसेनेत परतल्याचा आनंद आहे. शिवसेना ही लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत काम करणारी संघटना आहे. तालुक्यातील दडपशाहीला आळा घालणे, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणे हेच माझे पुढील ध्येय असेल," असेही त्यांनी सांगितले.
पोलीस, महसूल, कृषी, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती तसेच घरकुल आणि शौचालय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनमानी व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत गोरगरीब आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीत काम करताना वीज महावितरण समितीवर पाच वर्षे, जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य म्हणून सहा वर्षे, जलव्यवस्थापन समिती सदस्य, पक्ष निरीक्षक तसेच दुष्काळ निवारण समिती सदस्य म्हणून काम करण्याचा अनुभव मिळाला. या अनुभवाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीतील सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकांचा समन्वय साधून आगामी काळात बारामती विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वासही हनुमंत भापकर यांनी व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments