Type Here to Get Search Results !

आषाढी एकादशीनिमित्त पळशी जिल्हा परिषद शाळेची बाल वारकरी दिंडी उत्साहात

 


डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी 

 आषाढी एकादशीनिमित्त बारामती तालुक्यातील पळशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी विद्यार्थ्यांची भव्य बाल वारकरी दिंडी उत्साहात काढण्यात आली. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि विठ्ठलभक्ती विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचल्यानंतर संपूर्ण गावातून पारंपरिक पद्धतीने फिरविण्यात आली. दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीने दिंडीचे विशेष आकर्षण ठरले.



 विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली यांची रूपे साकारलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सर्व बाल वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग आणि भजन गात मार्गक्रमण करत होते. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात विद्यार्थी आणि शिक्षकही भक्तिरसात तल्लीन होऊन नृत्य करत सहभागी झाले.

पहिली ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि "विठ्ठल... विठ्ठल..."च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी फुगडी खेळत अभंगांच्या तालावर मनमुराद आनंद लुटला.



या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेतील सर्व शिक्षकांनी केले होते. दिंडीचे स्वागत पंचायत समिती सदस्य व गटनेते रावसाहेब चोरमले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासो सोनवलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोळेकर, संजय गुलदगड, आण्णा कोकरे, दशरथ कुंभार, दीपक धायगुडे, धनाजी माने, कुंडलिक माने, भगवान गुलदगड तसेच महिला व ग्रामस्थांनी उत्साहात केले. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटपही करण्यात आले.

  याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरलीधर हिरवे, बाळासो राजपुरे, मनीषा देशमुख, दीपक तावरे, उर्मिला राजपुरे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, ग्रामस्थ तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments