डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी विद्यार्थ्यांची भव्य बाल वारकरी शैक्षणिक दिंडी उत्साहात काढण्यात आली. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि विठ्ठलभक्ती विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी तसेच शिक्षणाचे महत्त्व सांगणारे व शाळा बाह्य मुलांचे शिक्षण यांविषयी माहितीचे स्लोगन असलेल्या दिंडी फलकांद्वारे प्रबोधन या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मासाळवाडी गावात हभप राहूल महाराज, विशाल महाराज, अश्विनी महाराज, पुनम महाराज, प्रितम महाराज असे कीर्तनकार असून सांप्रदायिक वातावरण आहे.
जि.प.मासाळवाडी शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी काळभैरवनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर संपूर्ण गावातून पारंपरिक पद्धतीने फिरविण्यात आली. दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीने दिंडीचे विशेष आकर्षण ठरले.
विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई यांची रूपे साकारलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसह सर्व बाल वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग आणि भजन गात मार्गक्रमण करत होते. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात विद्यार्थी आणि शिक्षक, पालक व विशेषतः ज्येष्ठ महिलाही भक्तिरसात तल्लीन होऊन नृत्य करत सहभागी झालया होत्या.
पहिली ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि "विठ्ठल...विठ्ठल..."च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. ग्रामदैवत श्री कालभैरवनाथव मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी फुगडी खेळत अभंगांच्या तालावर मनमुराद आनंद लुटला. तसेच याठिकाणी रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालखीमार्गात ठिकठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन केले. यानंतर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेतील सर्व शिक्षकांनी केले होते.
बारामती पंचायत समितीचे गटनेते रावसाहेब चोरमले, मासाळवाडी गावचे सरपंच मुरलीधर ठोंबरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक ठोंबरे, लक्ष्मण मासाळ, माणिक मासाळ, शितल बारवकर, राणी ठोंबरे, अमृता ठोंबरे, शितल ठोंबरे, छाया गोरे यांसह महिला व ग्रामस्थांनी उत्साहात दिंडीचे स्वागत केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपतराव मासाळ, अशोक जगदाळे, अनिल यादव, सविता भापकर, सुप्रिया कोळेकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, ग्रामस्थ तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments