डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती (वाकी, चोपडज, कानाडवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या दिंडीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी, पांढरवस्ती आणि चोपनवस्ती येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत समाजामध्ये पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि ग्रंथवाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रेरणादायी संदेश दिला.
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हातात विविध पर्यावरण जनजागृतीपर फलक घेऊन परिसरातून दिंडी काढली. "झाडे लावा, झाडे जगवा", "ग्रंथ हेच खरे ज्ञानाचे भांडार" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दिंडीचे वाकी, पांढरवस्ती, चोपडज व कानाडवाडी येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
या दिंडीची शोभा हनुमान भजनी मंडळ वाकी, पांढरवस्ती व चोपडज यांनी भजनांच्या माध्यमातून वाढवली. दिंडीदरम्यान भजन, फुगडी, रिंगण सोहळा आदी पारंपरिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून दिंडीचा आनंद लुटला.
या उपक्रमासाठी शिवराम गाडेकर, दिलीप गाडे, जालिंदर घाडगे, कुंडलिक जगताप, प्रल्हाद गाडेकर, बाबासाहेब गाडेकर, धनंजय जगताप, चंद्रकांत जगताप, गोरख साळुंखे, सुनिता जगताप आणि घाडगे नानी यांनी विशेष सहकार्य केले. विद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश जगताप याने मृदुंग वादन करून दिंडीची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एस. फरांदे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रवीण भोसले, उपाध्यक्ष हनुमंत जगताप, मानद सचिव रमेश भोसले व संचालक मंडळाने सर्वांचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांचा विद्यालयाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.


Post a Comment
0 Comments