Type Here to Get Search Results !

मुरारबाजी देशपांडे यांची पुण्यतिथी किल्ले पुरंदरवर भक्तिभावात साजरी

 


  डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी

  छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार श्रीमुरारबाजी देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी (दि. २२ जुलै) किल्ले पुरंदर येथील श्रीमुरारबाजी स्मारक परिसरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

 या निमित्ताने पुरंदरेश्वर मंदिरात सुनील राजेभोसले व अलका राजेभोसले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन राजेश सोनवणे व रोहन भिंताडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 त्यानंतर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास विश्व हिंदू परिषदेचे नेते मिलिंदभाऊ एकबोटे, मीनाकाकी सातव, कामिनीताई ताकवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. धाराऊ गाडे यांचे वंशज मयूर गाडे व अमित गाडे, शेखर जगताप (कोथळे) यांच्या हस्ते श्रीमुरारबाजी देशपांडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठेला उजाळा देत त्यांचे स्मरण करण्यात आले.



  यावेळी संदीपजी गोतनीस (श्रीमुरारबाजींचे वंशज), जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, पंचायत समिती सदस्य मनोज शिंदे, युवराज जाधवराव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मुरारबाजी देशपांडे यांच्या अतुलनीय शौर्याची माहिती देत तरुणांनी त्यांच्या विचारांचा आणि देशभक्तीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन मिलिंद भाऊ एकबोटे यांनी केले.

  कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. शुभम खेडेकर यांनी मुरारबाजी देशपांडे यांच्या इतिहासातील योगदानावर प्रकाश टाकत स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे आयोजन महावीर श्रीमुरारबाजी देशपांडे पुण्यतिथी उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुरंदर उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील राजेभोसले (जोगवडी) व बाळासाहेब जगताप (सासवड) यांनी विशेष परिश्रम घेतले. 



 यावेळी विकास बेलसरे, स्वानंद अत्रे, साईनाथ बलकवडे, अनिल खाडे, डॉ. सतीश भोसले, शांताराम भोसले, तसेच शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महावीर मुरारबाजी देशपांडे यांना अभिवादन केले. 

  यावेळी आप्पासाहेब पुरंदरे, आदित्य पुरंदरे यांनी महाप्रसादाची सोय केली. या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार अमित राजेभोसले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments