डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री सोमेश्वर विद्यालय (भाग शाळा), करंजे येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आणि त्यांच्या डोळ्यांतील आत्मविश्वास हीच स्व. अजितदादा पवार साहेबांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन किसनराव तांबे होते, तर पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई कदम-ढोले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी रोहिणीताई कदम-ढोले यांनी मनोगतात श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेने अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने राबविलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. "गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेला हा हात म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली नवी दिशा असून, हीच स्व. अजितदादा पवार साहेबांना खरी आदरांजली आहे," असे त्या म्हणाल्या.
निर्भया पथकातील पोलीस हवालदार शुभांगी दणाणे यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, मोबाईलचा संयमित वापर, अनोळखी व्यक्तींच्या भूलथापांना बळी न पडणे तसेच अडचण आल्यास पालक व पोलिसांची मदत घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तर करंजेपूल दूरक्षेत्र पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे पाटील यांनी सायबर गुन्हे, ऑनलाइन गेम्सचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि डिजिटल फसवणुकीपासून बचाव याविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात किसनराव तांबे यांनी श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असून अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकीची भावना दृढ होत असल्याचे सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत शालेय साहित्य संकलनासाठी सहकार्य करणाऱ्या "शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची ताकद असून समाजाने अशा विधायक कार्यात कायम सहभागी व्हावे," असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे, ऋषिकेश गायकवाड, उद्योजक संतोष कोंढाळकर, तसेच प्रकाश मोकाशी, प्रताप गायकवाड, शिवाजी शेंडकर, सुचिता साळवे, सचिन पाटोळे, विष्णुपंत दगडे, संताजी गायकवाड, मोहन भांडवलकर, प्रकाश हुंबरे, खुर्शिदा मुलानी, भगवान जोशी, राजेंद्र रासकर यांच्यासह अनेक मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एस. खैरे यांनी केले. सूत्रसंचालन व्ही. एल. पाटोळे यांनी, तर आभार प्रदर्शन एम. ए. गंगावणे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याध्यापक एस.ई. जगदाळे यांनी केले.




Post a Comment
0 Comments