डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पळशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वाड्यावस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या गरीब विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण १८ विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य बाबासाहेब चोरमले, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब गुलदगड, ग्रामपंचायत सदस्य शेखर करे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासो सोनवलकर, माजी सरपंच सोपान गुलदगड, माणिक काळे, गंगाराम गुलदगड, आण्णा कोकरे, रामा माने, रामदास पोटे, संजय गुलदगड, धनाजी माने, भगवान कोळेकर, नवनाथ कोळेकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उर्मिला राजपुरे यांनी प्रास्ताविक करून उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन मुरलीधर हिरवे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक बाळासाहेब आवाडे यांनी मानले.
या सायकल वाटप उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थिनींना शिक्षणासाठी नवी उभारी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरल्याचे मान्यवरांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments