डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पर्पेच्युअल डेट इन्स्ट्रुमेंट (PDI) आणि लाँग टर्म सबऑर्डिनेटेड बाँड्स (LTSB) या नव्या गुंतवणूक योजनांना बारामती तालुक्यातील पश्चिम जिरायत भागातील लोणी भापकर शाखेत ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच अनेक ग्राहकांनी या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे शाखेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दोन्ही योजनांचा शुभारंभ १५ दिवसांपूर्वी पुणे जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेकडून पीडीसीसी बँकेला बाँड उभारणीस परवानगी मिळाल्यानंतर या योजना सुरू करण्यात आल्या असून, ६५० कोटी रुपयांच्या बाँड उभारणीमुळे जिल्हा बँकेच्या आर्थिक विकासाला अधिक बळ मिळणार असल्याचे बँक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पीडीसीसीच्या एलटीएसबी बॉण्ड योजनेत १० हजार रुपयांचा एक बॉण्ड असून त्याच्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेवरील व्याजाची रक्कम दरमहा थेट गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या बॉण्डची मुदत १० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. नियमित मासिक उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना आकर्षक ठरत असल्याचे शाखा प्रशासनाने सांगितले.
पर्पेच्युअल डेट इन्स्ट्रुमेंट (PDI) योजनेअंतर्गतही किमान १० हजार रुपये किंवा त्याच्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेवर ८.५० टक्के व्याजदर देण्यात येत असून व्याजाची रक्कम प्रत्येक तीन महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे या बॉण्डची मुदत कायमस्वरूपी असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त मानली जात आहे.
या दोन्ही योजना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत राबविण्यात येत असून प्रारंभी गुंतवणुकीची अंतिम मुदत ६ ऑगस्ट होती. मात्र ग्राहकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे ही मुदत आता ११ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक गुंतवणूकदारांनी वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहन लोणी भापकर शाखेचे शाखाप्रमुख गणेश साबळे यांनी केले आहे.
या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना प्रमाणपत्र वितरणाचा छोटेखानी कार्यक्रम शाखेत आयोजित करण्यात आला. यावेळी शाखाप्रमुख गणेश साबळे, विकास अधिकारी विक्रम चौगुले, कॅशियर मयूर मोरे, लिपिक गणेश जाधव, गणेश यादव, हनुमंत झिटे, शरद आरडे तसेच ग्राहक शंकर माने, तात्यासाहेब गुलदगड आदी उपस्थित होते.
लोणी भापकर शाखेत मिळालेला प्रतिसाद पाहता पीडीसीसीच्या या नव्या गुंतवणूक योजनांना ग्रामीण भागातील ग्राहकांकडूनही चांगली पसंती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


Post a Comment
0 Comments