डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुर्टी येथील कु. जिज्ञासा सुमित जगदाळे हिने १० वर्ष वयोगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावून गावाचे, तालुक्याचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल केले.
जेजुरी येथे दि. ११ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय लाठीकाठी मर्दानी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले.
कु. जिज्ञासा हिने स्पर्धेतील विविध फेऱ्यांमध्ये आत्मविश्वासपूर्ण आणि दमदार खेळ करत परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या यशाबद्दल मुर्टी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून तिचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
या स्पर्धेत राजे प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल, खंडूखैरेवाडी या शाळेनेही उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सराव, समन्वय आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले. शाळेच्या या यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला असून ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला नवे व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
शाळेच्या वतीने सुवर्णपदक विजेती कु. जिज्ञासा जगदाळे तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राहुल यादव सर यांच्या मेहनतीचेही विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळविल्याचे शाळा व्यवस्थापनाने नमूद केले.


Post a Comment
0 Comments