डिजिटल महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, लोणी भापकर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भापकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि देशाप्रती असलेली आपली जबाबदारी व्यक्त केली. मान्यवरांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, राष्ट्रप्रेम, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सायंबाच्यावाडीचे सामाजिक कार्यकर्ते जयवंत बबनराव भापकर यांच्या कुटुंबाच्या वतीने नवीन सायकल देण्यात आली.
शिक्षणासाठी दूरवरून येणाऱ्या गरजू विद्यार्थ्याला या सायकलीचा फायदा होणार असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासाला मदत मिळणार आहे. सामाजिक कार्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
यावेळी सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भापकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार मदने, तानाजी जगदाळे, शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगताप, माजी मुख्याध्यापक बी. एस. भापकर, एस. एल. भापकर, टी. पी. भापकर, सुभाष भापकर, अविनाश बनसोडे, मनोज साठे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि देशभक्तीची भावना पाहायला मिळाली.


Post a Comment
0 Comments