डिजिटल महाराष्ट्र न्यूज : (प्रतिनिधी):
आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही पीक कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने किमान दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी ठाम मागणी पश्चिम बारामती शेतकरी समूहाने राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पश्चिम बारामती शेतकरी समूह, ता. बारामती, यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनात राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडे याच मागणीचे निवेदन देण्यात आल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी नमूद केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेती व्यवसायात उत्पादन खर्च, बियाणे, खते, औषधे, सिंचन, मजुरी तसेच बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांवर सतत आर्थिक ताण निर्माण होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही अनेक शेतकरी आपले पीक कर्ज वेळेत फेडून आर्थिक शिस्त पाळत आहेत.
शेतकरी प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, बँका, सोसायट्या व सहकारी संस्थांची आर्थिक व्यवस्था सुरळीत राहावी आणि स्वतःची पत अबाधित राहावी म्हणून अनेक शेतकरी कर्जफेडीच्या अंतिम मुदतीत रक्कम उभी करण्यासाठी नातेवाईकांकडून उसनवारी करतात, हातउसने पैसे घेतात किंवा प्रसंगी व्याजानेही रक्कम उभी करावी लागते. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.
“नियमितपणे कर्जफेड करणे हा आमचा दोष आहे का?”
या प्रश्नाद्वारे शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकरी समूहाने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना या मागणीचा सकारात्मक विचार करून शासन स्तरावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.
निवेदन दिल्यानंतर भरणे मामा म्हणाले, मलाही वाटतय की नियमित कर्ज फेडणारे शेतकऱ्यांना दोन लाख रुपये मिळाले पाहिजेत असं सांगून सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
या निवेदनावर जिरायती भागातील अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदन देताना पश्चिम बारामती शेतकरी समूहातील सुनिल राजे भोसले, सुखदेव पोपटराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष वामनतात्या जगताप, शंकर झेंडे, काशिनाथ पिंगळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांनी मांडलेली ही मागणी राज्यभरातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करणारी असून शासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments